Ad will apear here
Next
विठ्ठल... निरनिराळ्या बोलीभाषांमधला!


मराठीच्या बोलीभाषा हे खूप मोठं वैभव आहे. काळाच्या ओघात त्यांचा दैनंदिन वापर कमी झाला असला, तरी त्यात खूप मोठा ठेवा आहे. २०१९ हे संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय बोलीभाषा वर्ष म्हणून जाहीर केलं होतं. अनेक जण बोलीभाषांच्या संवर्धनासाठी आपापल्या पातळीवर विविध उपक्रम राबवत असतात. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने २०१९मध्ये ‘बोलू बोलीचे बोल’ या उपक्रमांतर्गत विविध बोलीभाषांमधले व्हिडिओ प्रसारित केले होते. सध्या बोलीभाषांचं वैभव चर्चेत आलं आहे ते ‘विठ्ठल’ या विंदा करंदीकरांच्या कवितेच्या विविध बोलीभाषांमधल्या रूपांतरामुळे. या कवितेची विविध बोलीभाषांमधली रूपांतरं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. अनेक जण त्यापासून प्रेरणा घेऊन आपाल्या भागातल्या बोलीभाषेतही त्याचं रूपांतर करत आहेत. त्यातून बोलीभाषांच्या वैभवाची छोटी झलक पाहायला मिळते आहे. त्यातील काही बोलीभाषांमधल्या कविता येथे देत आहोत. त्यात हिंदी आणि संस्कृतमधल्या अनुवादांचाही समावेश आहे.

विठ्ठल (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा;
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥

- विंदा करंदीकर 
..........
इट्टल (नगरी बोली)

पंडरपुरच्या येसिपासी
हाये येक छुटी साळा
सर्वी पोरं हायेत गुरी
योक मुल्गा कुट्ट काळा
दंगा कर्तो मस्ती कर्तो
खोड्या कर्ण्यात बी आट्टल!
मास्तर म्हंती करनार काय?
न जानू ह्यो आसन इट्टल!!! 

- काकासाहेब वाळुंजकर, अहमदनगर
...........
 इट्टल (मराठवाडी बोली)

पंडरपूरच्या येशीपशी
हाय बारकी साळा एक
सगळी पोरं हायत गोरी
कुट्ट काळं त्येच्यात एक
आगावपणा करतंय पोराटगी करतंय
आवचिंदपणाबी करण्यात हाय 
आट्टल... 
गुरजी मनत्यात करावं काय?
एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!

- डॉ. बालाजी मदन इंगळे, उमरगा
...........
इठ्ठल (लेवा गणबोली)

पंढरीच्या येशीपाशी
आहे एक छोटुशी शाया
सर्वे पोऱ्हय गोरे
एक पोऱ्या कुट्ट काया 
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या कऱ्यात आहे अट्टल
मास्तर म्हने करे काय
न जानो अशीन इठ्ठल

- प्रशांत धांडे, फैजपूर
...........
ईठ्ठल (अहिराणी)

पंढरपूरना शीवजोगे
एक शे धाकली शाया;
सम्दा पोरे शेतस गोरा
एक पोऱ्या किट्ट काया ।।
दांगडो करस, मस्त्या करस
खोड्या कराम्हा शे अट्टल;
मास्तर म्हने काय करो?
ना जानो हुई ईठ्ठल ।।

- नितीन खंडाळे, चाळीसगाव
...........
इठ्ठल (तावडी अनुवाद)

पंढरपूरच्या येसजोय
आहे एक छोटी शाया
सम्दे पोरं आहेती गोरे
एक पोऱ्या कुट्ट काया ।।
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या कऱ्यामधी आहे अट्टल
मास्तर म्हनता करनार काय?
ना जानो असीन इठ्ठल ।।

- प्रा. डॉ. प्रकाश सपकाळे, जळगाव
...........
इठ्ठल (बागलाणी अहिराणी) 

पंढरपूर नी येसपन
शे एक उलशी शाळा
सर्वा पोऱ्या गोरापान
येकच पोरगा कुट्ट काळा!
दंगा करस मस्ती करस
खोड्या काढा मा शे अट्टल
मास्तर म्हणतस करवा काय
न जाणो व्हयी इठ्ठल!

- वैभव तुपे, इगतपुरी 
...........
इठ्ठल (आदिवासी तडवी भिलबोली)

पंढरपूरची शिवंजवळं
ह एक लहानी शायी
सबन पोऱ्हा हती गोऱ्या
एक पोऱ्या ह कायाकुच
गोंदय करतो मस्ती करतो
खोळ्या करवात ह अट्टल
मास्तर म्हणतंहती करशान काय?
कोणाल माहित हुईन इठ्ठल

- रमजान गुलाब तडवी, बोरखेडा खुर्द, ता. यावल, जळगाव
...........
विठ्ठल (वऱ्हाडी बोली)

पंढरपूरच्या येशीजोळ
लहानचुकली शाळा हाये;
सबन लेकरं हायेत उजय
यक पोरगं कायंशार॥
दांगळो करते, मस्त्या करते
खोळ्या कऱ्याले अट्टल. 
गुर्जी म्हंतात कराव काय?
न जानो अशीन विठ्ठल ॥

- अरविंद शिंगाडे, खामगाव
...........
इठ्ठल (वऱ्हाडी अनुवाद)

पंढरपूरच्या वेसीजोळ
आहे एक लायनी शाळा
सारी पोर आहेत गोरी
एकच पोरगा डोमळा ॥
दंगा करते, दांगळो करते
खोळ्या करण्यात आहेत
पटाईत... 
मास्तर म्हणते कराव काय
न जाणो अशीन इठ्ठल ।।

- लोकमित्र संजय, नागपूर
...........
इठ्ठल (आगरी अनुवाद)

पंढरपूरचे येशीजरी
यक हाय बारकीशी शाला
सगली पोरा हायीत गोरी
यक पोऱ्या कुट काला।।
दंगा करतंय मस्ती करतंय
खोऱ्या करन्यान हाय
अट्टल... 
मास्तर बोलतान कराचा काय?
नायतं तो हासाचा इठ्ठल!

- तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)
...........
इट्टल (मालवणी अनुवाद)

पंडरपूराच्या येशीर 
एक शाळा आसा बारकी।
एकच पोरगो लय काळो:
बाकीची पोरां पिटासारकी।।
दंगो करता धुमशान घालता;
खोड्ये काडण्यात लय अट्टल।
मास्तर म्हणतंत करतंलास काय?
हयतोच निगाक शकता इट्टल।।

- मेघना जोशी, मालवण
...........
इटंल (तिलोरी/संगमेश्वरी बोली)

पंडरीचे हदंवं
हाय यक बारकुसी साला
बाकी पोरां गोमटेली
याक पॉर मतर काला
आवडान पान भलता
दांडगाय आंगात अट्टल
मास्तर म्हंतो काय करावा
निंगायचा झड्या इटंल!

- अरुण इंगवले, चिपळूण
.....
इठ्ठल (पारधी अनुवाद)

पंढरपूरना आगंमांग
छ येक धाकली शाया;
आख्खा छोकरा छं गोरा
यकजच छोकरो कुट्ट कायो!!
वचक्यो छं मस्त्या करस 
खोड करामं छं अट्टल 
मास्तर कवस करानू काय? 
कतानै आवस व्हसो तेवतो इठ्ठल!!

- प्रवीण पवार, धुळे
...........
इठ्ठल (बंजारा अनुवाद)

पंढरपूरेर सिमेकन,
एक हालकी शाळा छ!
सारी पोरपोऱ्या गोरे,
एक छोरा कालोभुर छ!
दंगो करचं मस्ती करचं!
खोडी करेम छ अट्टल!!
मास्तर कचं कांयी करू?
काळोभूर न जाणो इ इठ्ठल!!

- दिनेश राठोड, चाळीसगाव
...........
विठ्ठल (वंजारी अनुवाद)

पंढरपुरना हुदफर 
हे एक बारकुली शाळ
हंदा पोयरा हे गोरा 
एक पोयरो निववळ काळो
केकाटत, मसती करत
खोडयो करवामा हे अटट्ल
मासतर केत करवानो काय
 न जाणो हिवानो विठठ्ल

- सायली पिंपळे, पालघर
...........
विठ्ठल (हिंदी अनुवाद)
पंढरपूर नगरमें द्वारसमीप
है एक अनोखी पाठशाला
सुंदर सारे विद्यार्थी वहाँ के
एक बच्चा भी हैं काला... ।
उधम मचाये मस्तीमे मगन
है थोड़ा सा नटखटपन
गुरुजन कहे क्या करे जो
हो सकता हैं विट्ठल... ।

- सुनील खंडेलवाल, पिंपरी-चिंचवड़, पुणे
...........
विट्टल (कोळी अनुवाद)

पंढरपूरश्या वेहीवर, 
एक हाय बारकी शाळा। 
जखली पोरा गोरी गोरी। 
त्या मनी एक हाय जाम काळा। 
दन्गो करता न मस्तीव करता 
खोडी करनार अट्टल। 
न मास्तर हानता काय करु 
न जाणो यो हयेन विट्टल। 

- सुनंदा मेहेर, माहीम कोळीवाडा, मुंबई
...........
इठ्ठल (आगरी अनुवाद)

पंढरपुरचे हाद्दीव,
हाय येक बारकीच शाला. 
सगली पोरा हान गोरी,
येक पोर जामुच काला. 
उन्नार मस्ती करतय जाम,
खोऱ्या करन्यान वस्ताद हाय. 
गुरूजी सांगतान करनार काय,
नयत त आसल तो इठ्ठल. 

- नीलम पाटील, बिलालपाडा, नालासोपारा
...........
विट्टल (झाडीबोली)

पंढरपूराच्या सीवेपासी
आहे एक नआनसी स्याळा
सर्वी पोरे आहेत भुरे
एक पोरगा भलता कारा 
दंगा करतो मस्ती करतो
गदुल्या करण्यात अव्वल
मास्तर म्हणत्ये करणार काय?
न जानो असल विट्टल!

- रणदीप बिसने, नागपूर
...........
इठ्ठल (परदेशी बोली)

पंढरपुरका येशीपास
हय एक छोटी शाळा
सब पोर्ह्यान हय गोरा 
एक पोऱ्यो कुट्ट काळो
दंगा करं मस्ती करं
खोड्या करबामं हय अट्टल
मास्तर कहे कई करू?
कोनकू मालूम व्हयंगो इठ्ठल 

- विजयराज सातगावकर, पाचोरा
...........
विठ्ठल (पोवारी बोली)

पंढरपूरक् सिवजवर
से एक नहानसी शाळा
सप्पाई टुरा सेती गोरा
एक टुरा से भलतो कारा
दिंगा करसे मस्ती करसे
चेंगडी करनो मा से अव्वल
मास्तर कव्हसे का आब् करू?
नही त् रहे वु विठ्ठल!!

- रणदीप बिसने, नागपूर
...........
विठ्ठल (कोकणी सामवेदी बोली)

पंढरपूरश्या वेहीपा
एक बारकी शाळा हाय
आख्ये पोरे गोरेपान
पान एकूस काळोमस
खूप दंगोमस्ती करत्ये
खोड्यो काडण्यात अट्टल
मास्तर हांगात्ये,
का कऱ्यासा,
कुन जाणे, ओस हायदे विठ्ठल??

- जोसेफ तुस्कानो, वसई
...........
संस्कृत अनुवाद

पुण्डरीकपुरद्वारे पाठशालास्त्यविस्तृता ।
गौरच्छात्रपरीतास्यां बालः श्यामल एकलः ॥
धार्ष्ट्ये दक्षः सदैवायं दुर्विनीतोऽतिचापलः ।
वक्त्याचार्यः कथं भाव्यमपिस्यादेष विठ्ठलः ॥

- प्रणव प्र. गोखले, पुणे
........
विठ्ठल (कोल्हापुरी मराठी)

पंढरपूरच्या येशीजवळ
हाय येक छोटी शाळा
समदी पोरं हाईत गोरी
योक पोरगा कुट्ट काळा
दंगा करतंय, धुमशान घालतंय
किडे करन्यात हाय अट्टल,
मास्तर म्हनत्यात, करतैस काय?
कुनास ठाव, आसल बी इठ्ठल!

- सौमित्र पोटे
.........
विट्टल (झाडीपट्टी)

पंढरपूरच्या शिवं जवडं
यक छोटी शाडा
सर्वे पोट्टे हायेत भुरे
यक पोट्टा कुट्ट काडा
धिंगाने करते, मस्ती करते
खोड्या कराले हाये अट्टल
मास्तर म्हनतेत का करू बाप्पा
कोन जानं असन विट्टल ।।

- माधवी
...................
विठ्ठल (वारली)

पंढरपुराच्यें बाहांर आहें
बारकी एकुस साला
आखुटच पोयरें पांडरे-गोरे
एकुस होता काला
भरां करं मस्ती हों तों
भरां करं दंगल
गुर्ज्या म्हन् करांस काय?
आसंल जर्का विठ्ठल

- मुग्धा कर्णिक
.......................
विठ्ठल (चित्पावनी)

पंढरपुराचे शीमालागी
से एक इवळीशी शाळा
सगळीं भुरगीं सत गोरीं
एक बोड्यो काळीकुद्र कळा

बोव्वाळ करसे, धुमशाणा घालसे
किजबिट्यो काढसे हो अव्वल
मास्तर म्हणसे कितां करनार?
देव जाणे, सएल विठ्ठल

- स्मिता मोने अय्या (गोवा)
......................
इठ्ठल (वाडवळी बोली)

पंढरपुरश्या येहीवर 
हाय एक बारकी हाळा
तटे हात जकली पोरं गोरी
एक पोरं घणा काळा
दंगा करते मस्तीव करते
खोड्या करव्या हाय अट्टल
मास्तर बोलते करव्याह का?
कोणला माहीत अहेल इठ्ठल

- गौरव राऊत, केळवे माहीम
.....................
इठ्ठल (दखनी किंवा बागवानी)

पंढरपूरके हदकने
हय एक न्हन्नी इस्कूल
सब छोरदा हय गोरे
एक हय काला ठिक्कर
दंगा कर्ता मस्ती कर्ता
खोड्या कर्नेमें हय आट्टल
मास्तर बोल्ता कर्ना क्या
भौतेक इनेच आचिंगा इठ्ठल 

- इर्शाद बागवान
....................
इटलो (आदिवासी पावरी बोली, धगाव तालुका, नंदुरबार) 

पंढरपूरन हिवारोपर,
एक आयतली शाला से 
अख्खा पुऱ्या 
काकडा से 
एक सुरू से 
जास्ती (जारखो) काल्लो 
कपाली करतलो, 
मस्ती करतलो 
चाड्या करण्याम
से आगाडी पे!
काय करजे?
मास्तर कोयतलो,
काय मूंदु,
ओहे इटलो? (विठ्ठल)

- योगिनी खानोलकर
.......................
Vithu

Outside Pandharpur
There is a small school
All the kids are very fair
except for one black dude

Funny and trouble maker
He is a brat of highest order
teacher says, 
What to do?
Might be our own Vithu!

- Sameer Athalye






(तुम्ही तुमच्या भागातल्या बोलीभाषेत या कवितेचा अनुवाद केला असेल, तर तो या पोस्टच्या कॉमेंटबॉक्समध्ये तुमच्या आणि बोलीच्या नावासह जरूर पोस्ट करा.)

(कविवर्य कुसुमाग्रजांच्या कणा या गाजलेल्या कवितेचा विविध बोलीभाषांमधला अनुवाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(बाइट्स ऑफ इंडियाचा ‘बोलू बोलीचे बोल’ हा उपक्रम वाचण्यासाठी, पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WUDMCW
Similar Posts
कणा... कुसुमाग्रजांच्या कवितेचा विविध बोलीभाषांत अनुवाद ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या ‘विठ्ठल’ या कवितेचा मराठीच्या विविध बोलींमधला अनुवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणे आता आणखी एक ज्ञानपीठ विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची ‘कणा’ ही कविताही व्हायरल झाली आहे, ती तिच्या विविध बोलींमधल्या अनुवादासह... ती कविता आणि अनुवाद येथे देत आहोत
सब घोडे बारा टक्के! - अभिवाचन : वैभव मांगले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, लेखक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडते. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे अभिनेते वैभव मांगले यांनी... व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language